नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात गुन्ह्याच्या घटनांची मालिका कायम आहे. आडगाव परिसरातील धात्रक फाटा येथे महिलेचे चेन स्नॅचिंग करण्यात आले. दीड लाख रुपये किंमतीची पोत आणि गंठण चोरट्यांनी लांबवले. तर, पाथर्डी शिवारात धाडसी घरफोडीमध्ये २ लाखांचा ऐवज चोरी झाला आहे. याप्रकरणी आडगाव आणि इंदिरा नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धात्रक फाट्यावर चेनस्नॅचिंग
भाजीपाला खरेदीसाठी रस्त्याने पायी जाणाºया महिलेच्या गळ््यातील सुमारे दीड लाख रूपये किमतीची पोत आणि गंठण दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना धात्रकफाटा भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाया वालचंद वाघ (५९ रा.मुरलीधर बंगला,धात्रक फाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
वाघ या सोमवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. धात्रक फाटा भागातील भाजी बाजारात जात असतांना ही घटना घडली. मयुरेश अपार्टमेंटच्या दक्षिणेकडील कॉलनी रोडने त्या पायी जात असतांना अॅक्टीव्ह मेन्स पार्लर दुकानासमोर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सव्वा लाख रूपये किमतीची मोठी माळ व २५ हजार रूपये किमतीचे गंठण असा दीड लाख रूपये किमतीचे सोन्याचे अलंकार ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत.
नरहरी नगरच्या रोहाऊसमध्ये घरफोडी
पाथर्डी शिवारातील नरहरी भागात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ७५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया जयप्रकाश सेन (रा.साईराम रो हाऊस,म्हाडा कॉलनीजवळ,नरहरीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सेन कुटूंबिय गेल्या शुक्रवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचा कडीकोयंडा तोडून ही धाडसी घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले ७५ हजार रूपये किमतीची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख १२ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याचे मंगळसुत्र,नेकलेस,कानातील वेल असलेले झुमके,लटकन असलेले टॉप्स,सोनसाखळी,अंगठी,सोन्याचे मणी व अन्य अलंकाराचा समावेश आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.
Nashik City Crime Women Chain Snatching Dacoity