नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोत वाहनाच्या तोडफोडीच्या घटना घडत असताना आता विहितगावमध्येही गुंडांनी हैदोस घातला आहे. सोसायटीच्या आवारातील पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण आहे. या प्रकाराला त्वरीत आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विहितगावमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. मथुरा चौक येथील रामकृष्ण हरी प्राईड सोसायटीत दोघा गुंडांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा दुचाकी जाळल्या. त्याचप्रमाणे एक टेम्पोची काच फोडून रस्त्याने जाणार्या इतर वाहनांवर हल्ला करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत या गुंडांननी अगोदर महागड्या दुचाकीवर पेट्रोल ओतून हे कृत्य केले. त्यानंतर हातात कोयते घेत जवळच असलेल्या मालवाहू टेम्पोवर हल्ला चढवून काचा फोडल्या. त्यानंतर इतर वाहनांवर कोयत्याने हल्ला केला. या घटनेची माहिती समजताच उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व पथक घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेनंतर सोसायटीतील रहिवासी आक्रमक झाले आहे. त्यांनी या गुंडांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. आज सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.