नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवघ्या काही तासात उपनगर गुन्हे शोध पथकांनी चारचाकी गाड्यांची तोडफोड करणा-या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी मध्यरात्री नाशिकरोडला धोंगडे मळा येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालय समोर बंगल्याबाहेर लावलेल्या चार चारचाकी कार तलवार व कोयत्याने फोडल्या त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत या संशयितानाता ताब्यात घेतले आहे.
सिडको येथे वाहनांची तोडफोड त्यानंतर रविवारी विहितगाव येथे वाहनांची जाळपोळच्या घटना घडल्यानंतर नागरिकांमध्ये संताप होता. पण, पोलिसांनी या संशयितांना अवघ्या काही तासात ताब्यात घेतले. दारणा नदी किना-यावर हे संशयित लपून बसलेले होते. पोलिसांनी शुभम हरवीर बेनवाल उर्फ बाशी, रोशन उर्फ नेम्या रामदास पवार, मोइज् जावेद शेख व भैय्या उर्फ सत्यम देवल यांना ताब्यात घेतले. स्थानिक नागरिकांनी या संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांची मदत केली. उपनगर पोलिसातील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस हवालदार विनोद लखन, पी एन गुंड, जयंत शिंदे, सुरज गवळी, राहुल जगताप, गौरव गवळी, अनिल शिंदे यांनी या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविणा-या दोघांना पोलिसांनी केली अटक
कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविणा-या दोघांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. आदित्य परशुराम गदादे (१८) व अजय संतोष पेढेकर (१९ रा. दोघे बजरंगवाडी, नाशिक पुणे मार्ग) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहेत. याबाबत पोलिस शिपाई सागर जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंगवाडी येथील कोथमिरे मटन शॉप भागात दोन तरूण कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री धाव घेत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांच्या अगझडतीत लोखडी कोयता मिळून आला असून अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.