नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मंगळवारी (दि.२७) वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटार सायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सरकारवाडा आणि गंगापूर पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना गंगापूररोड भागात घडली. समाधान शंकर तेलंग (२४ रा.महादेवबाग कॉलनी,मखमलाबादरोड) यांची स्प्लेंडर एमएच १५ एचए ६२५३ मंगळवारी गंगापूररोडवरील जॉकी स्टोअर्स भागात पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार झिरवाळ करीत आहेत.
दुसरी घटना गोळे कॅालनीत घडली. विंचूर येथील शुभम राजेंद्र नेवगे हे मंगळवारी कामानिमित्त शहरात आले होते. गोळे कॉलनीतील डॉ.कुणाल गुप्ते यांच्या हॉस्पिटल समोर त्यांनी आपली शाईन एमएच १५ एफआर ६८६७ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
बुरकुले नगरमध्ये भरदिवसा घरफोडी
भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५५ हजाराच्या ऐवज लंपास केला. हनुमानवाडीतील बुरकुले नगर भागात ही घरफोडी झाली. या घरफोडीत सोन्याचांदीच्या दागिणे चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी त्र्यंबक टर्ले (रा.श्री समर्थ अपा.बुरकुलेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. टर्ले कुटूंबिय मंगळवारी (दि.२७) सकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दिनेश खैरणार करीत आहेत.