नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील एका व्यावसायिकास साडे सात लाख रूपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्क्रॅप व्यवसायात गुंतवणुक करण्यास भाग पाडून गुजरातच्या व्यावसायिकाने ही फसवणूक केली आहे. गुंतवणुकीच्या रकमेसह मोबदला न मिळाल्याने तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इकबाल अब्बास मन्सुरी (रा.कामरेज अंबोली सुरत,गुजरात) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याप्रकरणी इस्माईल अब्दूल गणी सोळंकी (५४ रा.साहिल हाईटस,सावित्रीबाई शाळेजवळ,पखालरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे नातेवाईक एकमेकांचे परिचीत असून मन्सुरी याचा स्क्रॅप खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित २५ मार्च २०१९ मध्ये शहरात आला होता. यावेळी त्याने सोळंकी यांना स्क्रॅप व्यवसायात मोठा नफा असल्याचे भासवून हा गंडा घातला.
भागीदारीत हा व्यवसाय करायचा असल्यास संशयिताने सोळंकी यांना पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार सोळंकी यांनी त्यास वेळोवेळी सात लाख ३० हजार रूपये दिले. मात्र पाच वर्ष उलटूनही संशयिताने गुंतवणुकीची अथवा नफ्याची रक्कम सोळंकी यांना दिली नाही. सदरच्या रकमेचा संशयिताने स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याचे निदर्शनास येताच सोळंकी यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.