नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गाळ्यात व्यवसाय सुरू करण्याच्या मोबदल्यात जीवे मारण्याची धमकी देत चौघांनी वृध्दाकडे दोन लाख रूपयांच्या खडणीची मागणी केली. खंडणी मागणा-या संशयितांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा गाडे, सुजाता गाडे यांच्यासह एक महिला व पुरूषाचा संशयित खंडणीखोरांमध्ये समावेश आहे. याप्रकरणी एकनाथ दगडू दळवी (रा.वेणूनगर,कामटवाडे) यांनी तक्रार दाखल केली आहे. दळवी यांचा महापालिका हद्दीतील चुंचाळे शिवारातील शुभम शॉपिंग सेंटर संकुलात व्यावसायिक गाळा आहे. बंद असलेल्या गाळ्यात व्यवसाय सुरू करावयाचा असल्याने दळवी गुरूवारी (दि.८) दुपारच्या सुमारास साफसफाई करण्यासाठी गेले असता ही घटना घडली.
गाडे यांना मायलेकासह अन्य एक महिला व पुरूषाने त्यांना गाठून शिवीगाळ केली. यावेळी संतप्त संशयितांनी गाळा सुरू करायचा असेल तर आम्हाला दोन लाख रूपये द्या नाही तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.