नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धमकी देणा-या खासगी सावकाराविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमीत व्याज देवूनही मुद्दलासाठी महिला घरी पाठवून तमाशा करण्याची भाषा वापरल्याने कर्जदाराने पोलिसात धाव घेतली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल भडांगे (रा. सिडको) असे संशयित सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी रोहन यशवंत नहिरे (रा. साई गौरव अपार्टमेंट, राजीवनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि कर्जदार एकमेकांचे परिचित असून कर्जदार नहिरे यांनी २०२० मध्ये व्यवसायासाठी संशयिताकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती.
या रकमेतील व्याजाची नियमित परत फेड करीत असतांना बुधवारी (दि.७) संशयिताने नेहरे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्याने व्याजासह मुद्दल आत्ताच्या आता परत कर असे म्हणून दमदाटी करीत शिवीगाळ केली. यावेळी संतप्त संशयिताने तुझ्या घरी महिला पाठवून तमाशा करतो अशी धमकी दिल्याने नहिरे यांनी पोलिसात धाव घेतली आहे.