नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्यवस्थापकानेच सराफी शोरूममधील ३६ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या आहे. चेतन किशोर विसपुते असे संशयित व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी संदेश लाल गोधवाणी (रा.कलानगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोधवाणी हे ओरा फाईन ज्वेलरी प्रा.लि. या सराफी शोरूमचे काम बघतात.कॅनडा कॉर्नर येथील बिझनेस स्क्वेअर बिल्डींगमधील शाखेत हा चोरीचा प्रकार घडला. ओरा फाईन या दुकान शाखेचा संशयित उप स्टोअर व्यवस्थापक असून त्यानेच दुकानातील सुमारे ३६ लाख २ हजार रूपये किमतीच्या चार बांगड्या लांबविल्याचा संशय असून हा प्रकार सोमवारी (दि.१७) सकाळी उघडकीस आला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
चेतनानगरला महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले
चेतनानगर भागात रस्त्याने पायी जाणा-या वृध्द महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. या घटनेत ६० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविण्यात आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमल बाबुराव कांबळे (६८ रा.देवीमंगल अपा.चेतनानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कांबळे या सोमवारी (दि.१७) सकाळी शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरात फेरफटका मारून त्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. कॉलनीरोडवरील तेजस बिल्डींगसमोरून त्या पायी जात असतांना अॅक्टीव्हावर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.