नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद रोडवरील रूख्मिणी लॉन्स येथून वधूच्या रूममधील पर्स चोरट्यांनी लंपास केली. या पर्स मध्ये सुमारे सव्वा दोन लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे होते. या चोरीप्रकरणी किरण अभिजीत तिडके (रा.बाजीरावनगर तिडके कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिडके कुटुंबिय रविवारी (दि.२) नातेवाईकांच्या विवाह सोहळयानिमित्त रूख्मीनी लॉन्स येथे गेले होते. दुपारच्या सुमारास विवाहाची धावपळ सुरू असतांना ही घटना घडली. किरण तिडके यांनी वधूच्या रूममध्ये ठेवलेली पर्स चोरट्यांनी चोरून नेली. अज्ञात चोरट्याने उघड्या रूममध्ये प्रवेश करून पर्स चोरली. या पर्समध्ये सुमारे दोन लाख दहा हजार रूपये किमतीचे अलंकार होते. अधिक तपास जमादार गायकवाड करीत आहेत.
दिंडोरी रोडवर महिलेचे चेनस्नॅचिंग
दिंडोरीरोड भागात रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा बापू आथरे (रा.कलानगर आकाश पंपाच्या मागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आथरे रविवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. दिंडोरीरोडवरील एमडी चायनिज समोरून त्या पायी जात असतांना ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळयातील मंगळसूत्राच्या वाट्या असलेली सुमारे ४० हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.