नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात चार लुटमारीच्या घटना गुरुवारी घडल्या. पंचवटीत कारमधून आलेल्या टोळक्याने तरूणास दमदाटी करीत त्याच्या खिशातील रोकड लंपास करण्याबरोबरच पादचारी महिलेचे मंगळसूत्र ओरबाडत भामट्यांनी दोन पादचा-यांची मोबाईल हिसकावून नेले. तर याप्रकरणी पंचवटी मुंबईनाका आणि उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिली घटना नाशिकरोड येथील जयभवानी रोड भागात घडली. उषा राजेंद्र शिंदे (रा.माऊली निवास,जयभवानीरोड) या गुरूवारी रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. परिसरातील राज प्रोव्हीजन किराणा दुकानासमोरून फेरफटका मारून त्या आपल्या घराकडे पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.
दुस-या घटनेत सिन्नर येथील संतोष अभिमन्यू गडाख (२९ रा.कानडे मळा) हा तरूण गुरूवारी दिंडोरीरोडवरील वजे्रश्वरी झोपडपट्टी भागात आला होता. सायंकाळच्या सुमारास तो सार्वजनिक शौचालय भागात उभा असतांना ही घटना घडली. ओमनी व्हॅनमधून आलेल्या चार जणांच्या टोळक्याने त्यास दमदाटी व अंगझडती घेत त्याच्या खिशातील सुमारे ११ हजार ५०० रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.
तिसरी घटना भाभानगर भागात घडली. नदीम मोहम्मद जावेद शेख (रा.रजा क्लासिक अपा.मेट्रो हॉस्पिटलक समोर वडाळारोड) हे गुरूवारी भाभानगर येथील नवशक्ती चौकातील नाईस मेडिकल स्टोअर्स समोरून फोनवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. पल्सरस्वारांनी त्यांच्या हातातील सुमारे दहा हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला.
चौथी घटना अशोकामार्ग भागात घडली. हाशिम नजमुद्दीन शेख (रा.गुलशननगर,वडाळागाव) हा युवक गुरूवारी अशोकामार्ग भागात गेला होता. सायंकाळच्या सुमारास तो मुंदडा कॉप्रोरेशन समोरून फोनवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने तो फोनवर बोलत जात असतांना स्प्लेंडर दुचाकीवर ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांनी त्याच्या हातातील सुमारे १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. दोन्ही घटनांप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात वेगवेगळे जबरीलुटीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक गिते व सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.