बसप्रवासात महिलेचे दागिन्यांची चोरी
बसच्या प्रवासात महिलेच्या बॅगेतील पर्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. पर्स मध्ये रोकडसह सुमारे २ लाख ६३ हजार रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा गुलाब महाजन (रा.बिडीकामगारनगर,अमृतधाम) यांनी तक्रार दाखल केली आहे. महाजन या अहमदनगर येथे गेल्या होत्या. सोमवारी (दि.२१) त्या परतीचा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. अहमदनगर येथील तारापूर बसस्थानकातून त्या एसटीने प्रवास करीत होत्या. नगर ते नाशिक दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये तीन हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ६३ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत.
विजयनगरला चंदनाची चोरी
बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याचा प्रकार औरंगाबाद नाका येथील विजयनगर भागात उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद शंकर गर्गे (७२ रा.विजयनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. गर्गे यांच्या बंगल्याच्या आवारात ही घटना घडली. चोरट्यानी मंगळवारी (दि.२२) वॉल कंपाऊडवरून उडी मारून आवारातील तीन साडे तीन फुट लांबीचे झाड कापून नेले. ही घटना परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून दोन चोरट्यांनी करवतीच्या सहाय्याने झाड कापून नेले. अधिक तपास पोलीस नाईक खाजेकर करीत आहेत.
भाविकांच्या मोबाईलवर डल्ले
धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांचे मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गोदाघाटावरील लेवा पाटीदार समाज ट्रस्टच्या निवासस्थानात घडली. चोरट्यांनी खिडकीत हात घालून चार्जिंगला लावलेले मोबाईल लांबविले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल भगवान कुटे (रा.खैरव ता.चिखली,बुलढाणा) यांनी तक्रार दाखल केली आहे. कुटे कुटूंबिय धार्मिक विधी करण्यासाठी आपल्या नातेवाईकांना सोबत घेवून शहरात दाखल झाले आहेत. गंगाघाटावरील लेवा पाटीदार समाज ट्रस्टच्या रूम न.१०२ व रूम नं.१०४ मध्ये हे कुटूंबिय आराम करीत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास खिडकीतून हात घालून चार्जिंगला लावलेले सुमारे ४० हजार रूपये किमतीचे व वेगवेगळ््या कंपनीचे चार मोबाईल चोरून नेले. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.