नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे सहा लाख रूपयांच्या ऐवज लंपास केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरुन नेले. या घरफोडी प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमसिंग बाबुलाल राठोड (रा.मोनल रो हाऊस,संभाजीनगर अशोकनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. राठोड कुटूंबिय शुक्रवारी (दि.२८) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६ लाख ५५ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
पत्र्याच्या शेडमधून मोबाईल व स्टील कटर मशीन चोरीला
पत्र्याच्या शेडमधून एकाने मोबाईल व स्टील कटर मशीन चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद रोडवरील निलगीरीबाग परिसरात ही चोरी झाली आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तम रमेश गायकवाड (२१ रा. निलगीरीबाग, औरंगाबादरोड) असे चोरी प्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी संतोष लालचंद गुप्ता (रा.साई इश्वर अपा.कपालेश्वर नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. गुप्ता यांनी निलगीरी बाग समोर कामगारांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले आहे. या शेडमधून गुरूवारी (दि.२७) रात्री ही चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी शेडमधील मोबाईल व स्टील कटर मशीन असा सुमारे २९ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली असून अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.