नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला. या घरफोडीत एक घरफोडी भरदिवसा झाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा आणि पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिली घटना सिडकोतील माऊली लॉन्स भागात घडली. नेहा आकाश बोराडे (रा.अक्षय रो हाऊस,स्वामी समर्थ केंद्राजवळ,मुरारीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बोराडे या रविवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७१ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
दुस-या घटनेत शरणपूररोडवरील अनुप प्रमोद पाटील (रा.सरला अपा.कॅनडा कॉर्नर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पाटील कुटुंबिय गेल्या शनिवारी (दि.२२) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड, सोन्याचांदीचे दागिणे तसेच देवघरातील देवी देवतांचे चांदीचे नाणे असा सुमारे ५५ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.