नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचा ऐवज लंपास केला. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी भद्रकाली आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील सदगुरूनगर भागात घडली. राजेश बळवंत येवला (रा.श्री सदगुरू अपा.सदगुरूनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. येवला कुटूंबिय शनिवारी (दि.८) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख १२ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उफनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
दुसरी घटना जुने नाशिक परिसरात घ़डली. येथील इलियास अब्दूल रहेमान कुरेशी (रा.अजमेरी मस्जिद जवळ,फकीरवाडी) यांनी तक्रार दिली आहे. कुरेशी यांच्या शेजारी राहणारे त्यांचे चुलत भाऊ यांचे कुटुंबिय रविवारी (दि.९) कामानिमित्त घराबाहेर पडले असता भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी भावाच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे १ लाख ३७ हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.