नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे बारा हजार रूपये लंपास केले. दिंडोरीरोडवरील शिवनगर भागात ही घरफोडी झाली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण जनार्दन रूईकर (५५ रा.तलाठी कॉलनी,शिवनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रूईकर कुटुंबिय गेल्या शनिवारी (दि.१०) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील १२ हजार ६०० रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.
पंचवटीत तडिपारास अटक
हद्दपारीची कारवाई केलेली असतांनाही शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. दिपक भिकन जगताप (२५ रा. कुमावतनगर, पंचवटी) असे अटक केलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगताप याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेवून पोलिसांनी त्यास शहर आणि जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच संशयित आपल्या घरी असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास धाव घेत त्यास बेड्या ठोकल्या. याबाबत अंमलदार नितीन जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.