नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४० हजाराच्या ऐवज लंपास केला. जेलरोड येथील शिवरामनगर भागात झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी आण्णा गंगाधर आरणे (रा.गजानन रो हाऊस,श्रीहरी लॉन्स जवळ,शिवरामनगर) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरणे कुटुंबिय १४ ते १८ मे दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ४० हजार ७०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.
महिलेच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला
नाशिकरोड येथील गुरूद्वारारोड भागात फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी कोमल प्रशांत बच्छाव (रा.आयनॉक्स सिनेमा समोर,शिवाजीनगर) यांनी तक्रार दिली असून उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बच्छाव गुरूवारी (दि.१८) नाशिकरोड येथील गुरूद्वारारोड भागात गेल्या होत्या. रात्री त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. बॅजो पिझ्झा समोरून त्या फोनवर बोलत पायी जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या हातातील सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राकेश भामरे करीत आहेत.