नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुचितानगर भागात भरदिवसा उघड्या घरात शिरून चोरट्यांनी कपाटातील रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे सव्वा तीन लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी प्रदिप राजाराम बोरसे (७१ रा.मधुमिलन सोसा.जेनित हॉस्पिटल बाजूला,सुचितानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरसे कुटुंबिय शुक्रवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास आपल्या घरकामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात शिरून हॉलमधील कपाटात ठेवलेल्या रोकडसह दागिणे असा सुमारे ३ लाख १५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार विजय म्हैसधुणे करीत आहेत.
शहरात राजरोस वावरणा-या तडीपारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात राजरोस वावरणा-या गावगुंडास पोलिसांनी अटक केली आहे. विशाल सोमनाथ गाढवे (३६ रा. घरकुल योजना,चुंचाळे शिवार) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने गोल्फ क्लब भागात ही कारवाई केली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाढवे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास पोलिसांनी शहर आणि जिह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी तो गोल्फ क्लब भागात दरोडा व शस्त्र विरोधी पथकाच्या हाती लागला. याबाबत अंमलदार युवराज गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक गोडे करीत आहेत.