नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागातून अॅटोरिक्षासह दोन मोटारसायकली चोरीला गेल्या आहे. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता वाहनधारकांकडून होवू लागली आहे.
पहिली घटना कामटवाडा भागात घडली. शुभम प्रकाश जैन (रा.प्लॉट नं.१५ अंबिकानगर,कामटवाडारोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जैन यांची अॅक्टीव्हा एमएच १५ सीक्यू १९३३ शनिवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुस-या घटनेत सिन्नर फाटा येथील अतुल अनिल थोरात (रा.अश्विनी कॉळनी,सामनगावरोड) हे रविवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास धार्मिक कार्यक्रमानिमित्त गोदाघाटावर आले होते. यशवंतराव महाराज मंदिर पटांगणावर त्यांनी आपली अॅटोरिक्षा एमएच १५ वाय ४६५० पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली.
तिसरी घटना मार्केट यार्डात घडली. मिना शामराव गुंजाळ (रा.अश्वमेधनगर,पेठरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुंजाळ या रविवारी (दि.२३) भाजीपाला खरेदीसाठी मार्केट यार्डात गेल्या होत्या. ज्ञानेश्वर भाजीपाला कंपनी पाठीमागे त्यांनी आपली अॅक्टीव्हा एमएच १५ जीडी १०९३ पार्क केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. दोन्ही गुह्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे हवालदार शेवाळे व पोलिस नाईक मोरे करीत आहेत.
महिलेचे मंगळसूत्र लांबवले
जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी लंपास केले. रवी शंकर मार्ग भागात ही घटना घडली. याप्रकरणी चारूलता गिरीश पाटील (५८ रा.अजिंक्यतारा सोसा.वडाळा शिवार,रविशंकर मार्ग) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून भामट्यांचा शोध घेत आहेत. पाटील या सोमवारी (दि.२४) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. परिसरातील कॉलनीरोडने त्या पायी जात असतांना अंबिका रेसिडन्सी समोर मोपेड दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ५० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक अतुल पाटील करीत आहेत.