नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तिडके कॉलनी भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे चार लाखाच्या ऐवज चोरुन नेला. या घरफोडीत चोरटयांनी सोन्याचांदीचे दागिणे व रोख रोकड लंपास केली. या चोरी प्रकरणी पायल अतुल दानेच (रा. स्नेहवर्धिनी सोसा. सिबल फर्निचर मागे, तिडके कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दानेच कुटुंबिय गेल्या शुक्रवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे ३ लाख ७६ हजार १०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार संदिप पाटील करीत आहेत.
पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला
शहरात बुधवारी वेगवेगळ्या भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला गेल्या. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. पहिली घटना कामटवाड्यात घडली. योगेश वासूदेव जुन्नरे (रा.रसिक अव्हेन्यू एस्पालीयर शाळेसमोर कामटवाडे) यांची पल्सर एमएच १५ जीपी २३८३ बुधवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.
दुस-या घटनेत मखमलाबादरोड वरील सागर जयराम भडांगे (रा.तुळजाभवानीनगर, पाटाजवळ) यांची अॅक्सेस मोपेड एमएच १५ जीएन ११६३ गेल्या बुधवारी रात्री परिसरातील ग्रिन जिमच्या गेटजवळ पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस नाईक बाविस्कर करीत आहेत.