नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गोविंदनगर भागात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी ५० हजाराची सोनसाखळी ओरबडून नेली. या चोरी प्रकरणी विश्वजीत विजय कर्माकर (४३ रा.श्रीजी अपा.सदगुरूनगर) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबई नाका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्माकर मंगळवारी (दि.२८) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. युनिव्हर्सल सर्व्हीस स्टेशन समोरून ते पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या दोघांनी त्यांना गाठले. यावेळी पत्ता विचारण्याचा बहाणा करून भामट्यांनी त्यांच्या गळयातील ५० हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पाटील करीत आहेत.
कलानगरमध्ये घरफोडी
कलानगर भागात गॅलरीतून प्रवेश करीत चोरट्यांनी घरातील रोकडसह दागिणे लंपास केले. यात ७३ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करिष्मा दिनेश बिरारी (रा.पहिला मजला,श्रीजी कॉम्प्लेक्स कलानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.२८) रात्री ही घटना घडली. बिरारी कुटूंबिय झोपी गेले असता अज्ञात चोरट्यांनी गॅलरीत चढून घरात प्रवेश केला व कपाटातील रोकड,दागिणे व मोबाईल असा सुमारे ७२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत.