नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन मेळा बसस्थानक इमारतीवर सुशोभिकरणासाठी लावलेली तांब्याच्या पट्या आणि रॉड चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या या बस स्थानकातून ही चोरी झाली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मेळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिक १ नंबर डेपोचे आगार व्यवस्थापक प्रतापसिंग दिलीपसिंग राजपूत यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वर्दळीच्या जुन्या सीबीएस शेजारी नवीन मेळा बसस्थानकाचे प्रशस्त बांधकाम झाले आहे. या बसस्थानकाच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस रापता असतांना ही घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बसस्थान इमारतीच्या टेरेसवर सुशोभिकरणासाठी लावलेल्या तांब्याच्या पट्या,रॉड आणि सोलर वायर असा सुमारे ९३ हजाराचा ऐवज पळविला आहे.
ही घटना २ ते २५ जून दरम्यान घडली असून, नवीन बसस्थानकाचे बांधकाम गेल्या काही दिवसांपूर्वीच पुर्ण झालेले असतांना उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. त्यातून नवीन इमारतीत चो-या मा-या वाढल्या आहेत. अधिक तपास पोलिस नाईक साबळे करीत आहेत.