नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात मंगळवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी सरकारवाडा आणि पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना मखमलाबाद नाका भागात घडली. ओम रविंद्र धात्रक (१७ रा.श्री दत्तनिवास,राजपाल कॉलनी) या अल्पवयीन मुलाने मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास चादर बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच वडिल रविंद्र धात्रक यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ.के.टी.शिदे यांनी मृत घोषीत केले.याप्रकरणी पोलिस नाईक योगेश अहिवळे यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
दुस-या घटनेत विक्की अशोक पवार (३२ रा.राहूलनगर,तिडके कॉलनी) याने सोमवारी रात्री ठक्कर बाजार बसस्थानक परिसरातील जनता हॉटेल मागे अज्ञात कारणातून दारूच्या नशेत आपल्या डोक्यावर काचेची बाटली मारून घेतली होती. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरीकांनी तात्काळ त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले दुस-या दिवशी उपचार सुरू असतांना डॉ. कल्पेश शिलोडे यांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.
सिंहस्थनगरला घरफोडी
घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४८ हजार रूपये किमतीच्या ऐवज चोरुन नेल्याची घटना सिडकोतील सिंहस्थनगर भागात झाली. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नम्रता सुधिर खिल्लारे (रा. बुध्दविहार पाठीमागे, सिंहस्थनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खिल्लारे कुटुंबिय गेल्या बुधवारी (दि.७) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४८ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.