नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथे २९ वर्षाच्या युवकाने स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदीप सहाने असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. दारणा नदी जवळील भैरवनाथ मंदिराजवळ आज सकाळी ही घटना घडली.
सहाने याच्या आत्महत्याचे कारण मात्र समजू शकले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार कौटुंबिक वादातून संदीप सहाने याने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. ही घटना नातेवाईकांना आणि नागरिकांना समजताच त्यांनी नाशिकरोड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. येथे पोलिसांनी पंचनामा करुन या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कार्यरत होता. त्याचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. आज सकाळी तो घरातून बाहेर पडला. महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतो असे त्याने पत्नीला सांगितले. त्यानंतर त्याने पळसे येथील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतले. तेथून घरी परतण्यापूर्वी त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना ही बाब कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. संदीप जवळील गावठी कट्टाही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
संदीपकडे गावटी कट्टा कुठून आला, त्याने आत्महत्या का केली, यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.