नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात शुक्रवारी वेगवेगळया भागात राहणा-या तीघांनी आत्महत्या केली. या आत्महत्येत दोन जणांनी गळफास लावून घेत तर महिलेने विषारी औषध सेवन करून जीवन संपवले. या तिघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी मुंबईनाका, उपनगर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना चेतनानगर भागात घडली. तिरूमला अपार्टमेंट मध्ये राहणा-या किर्ती आशितोष शर्मा (३२) यांनी शुक्रवारी सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच पती आशितोष शर्मा यांनी त्यांना तात्काळ लेखानगर येथील लाईफ केअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.संदिप गायधनी यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत डॉ.राकेश पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.
दुस-या घटनेत संभाजी चौकातील सोमकांत लक्ष्मीबा पध्ये (६३ रा.साईद्वार अपा.उंटवाडीरोड) यांनी शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये कापडा बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना निदर्शनास येताच त्यांना कुटुंबियांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.
तिसरी घटना जेलरोड भागात घडली. मृणाल काशिनाथ जाधव (१९ रा.आदर्श नगर,शिवाजीनगर) या युवतीने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना समोर येताच आई सुनिता जाधव यांनी तिला तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीस सुत्रांनी उपचारापूर्वी तपासून मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक हिवाळे करीत आहेत.
nashik city crime suicide death