नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २१ वर्षीय तरूणीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना वासाळी येथे घडली. पुनम कृष्णा रोकडे असे मृत युवतीचे नाव आहे. पुनमच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुनम रोकडे या तरूणीने शनिवारी (दि.१७) सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच वडिल कृष्णा रोकडे यांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता रविवारी उपचार सुरू असतांना डॉ.सागर अकोटे यांनी तिला मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.
काझीपुऱ्यात व्यावसायिकाला बेदम मारहाण
जुने नाशिक भागातील काझीपुरा येथे व्यावसायीक स्पर्धेतून टोळक्याने एका व्यावसायीकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत दुकानातील काचेचे बाऊल फेकून मारल्याने व्यावसायीक जखमी झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात पाच जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशरफ पठाण, जुबेर पठाण, अली जुबेर पठाण, आलीया जुबेर पठाण व जुबेर पठाणची बहिण अशी व्यावसायीकास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी वाहीद सिराज शेख (रा.कमोदरोड,काजीपुरा) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख यांचा कमोदरोडवर व्यवसाय असून रविवारी (दि.१८) सायंकाळी ते आपल्या दुकानात व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. संशयित टोळक्याने व्यावसायीक स्पर्धेची कुरापत काढून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी संशयितांनी दुकानातील काचेचे बाऊल फेकून मारल्याने शेख जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बिडगर करीत आहेत.