नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंद्रकुंड भागात दोन वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रविण उर्फ बादल पवन वाघ (२३ रा.म्हसोबा मंदिरामागे,एरंडवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघ याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास दोन वर्षासाठी तडिपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर असतांनाच शुक्रवारी (दि.२१) तो इंद्रकुंड भागात मिळून आला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी वैभव परदेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक नांदुडीकर करीत आहेत.
४७ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन केली आत्महत्या
४७ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना चुंचाळे परिसरात घडली. विरेंद्र अनंत राय (रा.आझादनगर,अंबड लिंकरोड,चुंचाळे) असे मृत इसमाचे नाव आहे. राय यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राय यांनी गुरूवारी (दि.२०) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा सचिन रॉय याने त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार अहिरराव करीत आहेत.