नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात सोमवारी वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी आत्महत्या केली. या आत्महत्यांमध्ये एका अनोळखी तरूणाचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड नाशिकरोड व म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना सिन्नरफाटा भागात उघडकीस आली. शिवाजी दशरथ खंबरे (२९ रा.सार्थक बंगला,संमेश्वरनगर) या युवकाने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत घरमालक अर्चना थोरात यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.
दुस-या घटनेत कामटवाडा परिसरातील माऊली लॉन्स भागात राहणारे भगवान काशिनाथ लोहार (५२ रा.एकता अपा.गणेश स्विटस मागे) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत प्रशांत लोहार यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.
तिसरी घटना म्हसरूळ आडगाव मार्गावरील स्मशानभूमी भागात समोर आली. स्मशानभूमिजवळील एका बंद झोपडीत २५ ते ३० वयोगटातील अनोळखी तरूणाने अज्ञात कारणातून बांबूला कपडा बांधून गळफास लावून घेतला होता. झोपडी मालक विकी राखपसरे (रा.वैदूवाडी) रविवारी (दि.११) झोपडीची साफसफाई करण्यासाठी गेले असता हा प्रकार समोर आला. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.