नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यात एका महिलेचा समावेश असून दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना शरणपूर भागात घडली. शैलेश गणपत गारे (४२ रा,विसेमळा) यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकाला टॉवेल बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनाश येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.राम पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
दुस-या घटनेत सिडकोतील शितल योगेश पाटील (३१ रा.पाटीलनगर,त्रिमुर्तीचौक) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्याकडीस साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत राहूल पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक महाजन करीत आहेत.