नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील एका साखर व्यापाऱ्यास आंध्र प्रदेशातील व्यापा-यांनी तब्बल सव्वा बावीस लाखाला गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. साखरेचा पुरवठा करण्यासाठी ऑनलाईन पैसे स्विकारूनही मालाचा पुरवठा न करता संशयितांनी संपर्क तोडल्याने व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी पाच व्यापा-यांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अददागिरी समिरकुमार, अददागिरी श्रीरामलू, कल्लूगुट्टी चरणकुमार, राघवेंद्रकुमार अददागिरी व कोटापल्ली नरेश अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत. याप्रकरणी शहरातील किराणा व्यावसायिक गौतम भाऊसाहेब वाडेकर (रा.पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. वाडेकर यांचे पाथर्डीरोडवर जय बजरंग ट्रेंडिग कंपनी नावाचे होलसेल दुकान असून, या दुकानासाठी त्यांनी साखर खरेदीची ऑर्डर दिली असता ही घटना घडली. नेहमी प्रमाणे गेल्या जुलै मध्ये संशयित आणि वाडेकर यांच्यात साखर खरेदीबाबत चर्चा झाली होती.
यावेळी ठरलेल्या भावानुसार साखर पुरवठा करण्याची संबधीतांनी ग्वाही दिल्याने ७ ते ११ जुलै दरम्यान वाडेकर यांनी सुमारे २२ लाख २४ हजार ५०० रूपयांची रोकड आरटीजीएसच्या माध्यमातून पाठविली. मात्र महिना उलटूनही साखर पोहच झाली नाही. त्यामुळे वाडेकर यांनी पुन्हा संशयितांशी संपर्क साधला असता प्रारंभी त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर सर्वांचाच संपर्क तुटल्याने वाडेकर यांनी पोलिसात धाव घेतली असून,अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शंकरसिंग राजपूत करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
nashik city crime Sugar Trader Lakh Cheating Andhra Pardesh Businessman