नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत एकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भुषण निवृत्ती भारंबे (४१ रा.रजत पार्क, वनश्री कॉलनी अंबड लिंकरोड) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारंबे यांनी आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे.
भारंबे यांचा मृतदेह बुधवारी (दि.५) दुपारी सोसायटीच्या गच्चीवरील हजार लिटर पाण्याच्या टाकीत आढळून आला. शालक गणेश सुपडू पाटील यांनी त्यांना पाण्याबाहेर काढून तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. दरम्यान भारंबे यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबतच्या चर्चेस उधाण आले असून पोलिस सर्व बांजूनी तपास करीत आहेत. अधिक तपास पोलिस नाईक संगम करीत आहेत.
बेकायदा दारू विक्री करणा-यांवर कारवाई
बेकायदा दारू विक्री करणा-या दोन विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे साडे चार हजार रूपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली कारवाई वडाळागावात करण्यात आली. बाबा किराणा दुकानामागे रात्रीच्या वेळी बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इंदिरानगर पोलिसांनी सापळा लावण्यात आला होता. भाऊराव बाळू बत्तीसे (रा.साठेनगर) हा तेथे दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून सुमारे ९८० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याबाबत अंमलदार सौरभ माळी यांनी तक्रार दिल्याने इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
दुस-या कारवाईत एकलहरा रोडवरील खाद्यपदार्थाच्या हातगाड्यावर बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने तपासणी केली असता मयुर गणेश खैरनार (३० रा.प्रगतीनगर सायखेडारोड) हा आपल्या सानप कॉम्प्लेक्स समोरील साई नाष्टा सेंटर नावाच्या हातगाड्यावर दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून तीन हजार ७१० रूपये किमतीच्या प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी हवालदार भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक ठेपणे करीत आहेत.