नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराजवळील शिंदे गावात हत्येचा प्रकार समोर आला आहे. युवकाने महिलेच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून तिला जीवे ठार मारले आहे. जनाबाई भिवाजी बर्डे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी निकेश दादाजी पवार या युवकाला अटक करण्यात आली आहे. नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनाबाई यांच्या अंगात येत असे. त्याद्वारे त्या विविध व्यक्तींच्या शंकांचे निरसन करीत असत. त्यांना विविध सल्ले देत असे. गावासह अनेक भागातील व्यक्ती या महिलेकडे समस्या घेऊन येत असत. संशयित आरोपी निकेश हा सुद्धा त्यापैकीच एक होता. गेल्या अनेक दिवसांपासून निकेश पवार हा जनाबाईकडे विविध समस्या घेऊन येत होता. मात्र, त्याच्या समस्या काही केल्या कमी होत नव्हत्या. त्यामुळे तो नैराश्येत गेला होता. आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास निकेश हा त्याच्या समस्या घेऊन जनाबाई यांच्याकडे आला. घरी आल्यानंतर तो जरा वेळ बसला. जनाबाईचे सल्ले निरुपयोगी ठरत असल्याचा संताप व्यक्त करीत निकेशने चाकू बाहेर काढला. जनाबाई यांची नजर चुकवून त्याने आपल्या हातातील चाकूने जनाबाई यांच्या मानेवर व शरीरावर जोरदार वार केले.
या हल्ल्यात जनाबाई या रक्तबंबाळ झाल्या. त्यानंतर याप्रकरणाची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी निकेशला ताब्यात घेतले. सर्व चौकशी केले असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.