नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील शिवाजी चौक भाजी मार्केट भागात कुठलेही कारण नसतांना रस्त्यात गाठून दोन जणांनी एका वृध्दास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने वृध्द जखमी झाले आहे. याप्रकरणी मुस्ताक युसूफ चाबुकस्वार (६२ रा.फिरदोस कॉलनी,औदूंबर स्टॉप सिडको) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाबुकस्वार हे गेल्या ७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी सिडकोतील शिवाजी चौकात गेले होते. भाजीपाला खरेदी करून ते घराकडे पायी जात असतांना वाटेत दोघांनी त्यांना अडविले. यावेळी एकाने चाबुकस्वार यांच्याकडे बघून हाच तो इसम असे म्हणून दोघांनी थेट मारहाण केली. या घटनेत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने चाबुकस्वार जखमी झाले होते. अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.