नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका महिलेस साडे आठ लाखाला गंडा घातल्याचे समोर आले आहे. मुलाला नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नातेवाईक महिलेनेच हा गंडा घातला आहे. राजकारण्यांसह शासकीय अधिका-यांशी ओळख असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली समीर कदम (३४ रा. गंगावाडी, ता.खेड, रत्नागिरी) असे संशयित ठकबाज महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पाथर्डी फाटा भागात राहणा-या माधुरी पोटे (रा. मुरलीधरनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित व तक्रारदार एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात एकमेकांच्या घरी येणे जाणे आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात संशयित महिला पोटे यांच्या घरी आली होती. यावेळी अनेक राजकारणी लोकांशी तसेच शासकीय अधिका-यांशी आपले चांगले संबध असल्याचे सांगून तिने मुलांना सरकारी नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखविले.
सदर महिला नातेवाईक असल्याने पोटे यांचा विश्वास बसला. यानंतर सदर महिलेने रोख स्वरूपात आणि ऑनलाईन सुमारे साडे आठ लाख रूपयांची रक्कम स्विकारली. वर्ष उलटूनही नोकरी अथवा पैसे परत न मिळाल्याने पोटे यांनी तिच्याशी संपर्क साधला असता तिने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राजपूत करीत आहेत.