जेलरोडला डिलेव्हरी बॉयला लुटले
नाशिक – घड्याळाची डिलेव्हरी देवून घराकडे परतणाऱ्या तरूणास लुटल्याप्रकरणी पोलीसांनी दोघांना अटक केली. संशयीतांचा सराईत साथीदार फरार असून ही घटना जेलरोड भागात घडली होती. डिलेव्हरी बॉयची दुचाकी अडवीत संशयीतांनी धमकावीत डिजीटल घड्याळ बळजबरीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्तीक पालकर (रा.बालाजीनगर,मोरे मळा),वैभव जाधव (रा.आडगाव शिवार) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे असून साहिल उर्फ पोश राजू मांगकाली (रा.रोकडोबावाडी) हा पोलीस रेकॉर्डवरील त्यांचा साथीदार अद्याप फरार आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम विठ्ठल उगलमुगले (२२ रा.द्वारकानगर,जेलरोड) या युवकाने तक्रार दिली आहे. उगलमुगले हा एका नामांकीत कंपनीत डिलेव्हरी बॉयचे काम करतो. शनिवारी (दि.१०) रात्री तो केकची आॅर्डर देवून आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. दुचाकीने जेलरोड भागातून तो प्रवास करीत असतांना आठवण हॉटेल समोर पल्सरवर आलेल्या संशयीत त्रिकुटाने त्यास अडविले. कोयत्याचा धाक दाखवून व धमकावीत त्याची बॅग तपासण्यात आली. यावेळी संतप्त त्रिकुटाने हाती काही लागले नाही म्हणून बँग फाडून काढत उगलमुगले याच्या हातातील सुमारे सााडे तीन हजार रूपये किमतीचे स्मार्ट वॉच बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.
—
सिडकोतील उत्तमनगरमध्ये लाखाची घरफोडी
नाशिक – सिडकोतील उत्तमनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी एक लाखाच्या मुद्देमालावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिनल शैलेश सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनवणे कुटूंबिय शनिवारी (दि.१०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील दहा हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ९० हजार ६०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास अंमलदार कैलास सोनवणे करीत आहेत.
—