नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहवासनगर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२४ मध्ये पुरवठा विभागाने अचानक केलेल्या पाहणीत बेकायदा धान्यसाठा आढळून आला. या पाहणीत दुकानदार काळाबाजार करीत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश नारायण माळी (रा.जनरल वैद्यनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित स्वस्त धान्य दुकान मालकाचे नाव आहे. याप्रकरणी सिडको कार्यक्षेत्राचे पुरवठा निरीक्षक राहूल डोळस यांनी तक्रार दाखल केली आहे. स्वस्त धान्य दुकानातील भ्रष्ट्राचार रोखण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने अचानक पाहणी दौरा सुरू आहे. गुरूवारी (दि.८) दुपारच्या सुमारास निरीक्षक डोळस यांच्या पथकाने अचानक केलेल्या पाहणीत हा प्रकार आढळून आला आहे.
कालिका मंदिर पाठीमागील जीवनरक्षा सोसायटीत असलेल्या संशयिताच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२४ मध्ये मंजूर साठ्या पेक्षा अधिक धान्यसाठा आढळून आला. शासकिय धान्याची अफरातफर अथवा काळा बाजार करण्याच्या उद्देशाने संशयिताने दुकानात साठा केल्याचे बोलले जात असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सूरी करीत आहेत.