नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीतील राजवाड्यात मद्यपान करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त चार जणांच्या टोळक्याने २२ वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी रामचंद्र हरिभाऊ पगारे (रा. घर नं. ४३९८ राजवाडा,पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील संशयितांपैकी एकास अटक करण्यात आली असून उर्वरीतांचा पोलिस शोध घेत आहेत. विक्की नेटावडे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याचे स्वप्नील उन्हवणे, देवेंश कांबळे आणि टक्या उर्फ विक्रांत नेटावटे हे साथीदार अद्याप पसार आहेत. पगारे यांचा मुलगा अभय रामचंद्र पगारे (२२) या घटनेत जखमी झाला आहे.
अभय पगारे हा युवक सोमवारी (दि.२१) आपल्या घरासमोर उभा असतांना संशयितांनी त्यास गाठून दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली. यावेळी पगारे याने पैसे देण्यास नकार दिला असता संतप्त टोळक्याने त्यास शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्याच्यावर कुठल्यातरी धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत पगारे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत.