नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खडीक्रेशर व्यावसायिकास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वादातून अज्ञात दुचाकीस्वारांनी तडजोडी करून भावास पैसे देवून टाक अन्यथा कुटुंबियास संपवून टाकू अशी धमकी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन बापू नवले (रा.पंडीत कॉलनी, नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केला आहे. व्यावसायिक नवले यांचा वडिलोपार्जीत जमिनीचा वाद सुरू असून, सोमवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास ते पेठरोडने आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. फुलेनगर परिसरातील कॅनल भागात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवित ही धमकी दिली. दत्तूभाऊला तडजोड पैसे देवून वादग्रस्त वडिलोपार्जीत जमिनीचा विषय पाच दिवसात संपवून टाका अन्यथा तुला व तुझ्या कुटूंबियास संपवून टाकू अशी दुचाकीस्वार संशयितांनी त्यांना धमकी दिली. या घटनेचे गांभिर्य ओळखून नवले यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास पोलिस नाईक माळवाळ करीत आहेत.
जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई
जुगार खेळणा-या तीन जणांवर पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नसीर अकबर पठाण (रा. आंबेडकर पुतळ्या पाठीमागे, पंचशिलनगर), रफिक जैनुद्दीन शेख (रा. दुधबाजार, भद्रकाली) व राजू देविदास सोनपसारे (रा. सहकारनगर, भिमवाडी, गंजमाळ) अशी संशयित जुगारींची नावे आहेत.
पंचशिलनगर येथील पडक्या थिएटरच्या भिंतीलगत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सोमवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास छापा टाकला असता वरील तिघे अंक अकड्यावर पैसे लावून टाईम ओपन नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे २ हजार ७० रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार सागर निकुंभ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक कोळी करीत आहेत.