नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जेलरोड भागात घरासमोर कार पार्क केल्याच्या कारणातून दोघांनी एकास बेदम मारहाण केली. या हाणामारीत हातातील वजनी कड्याचा वापर करण्यात आल्याने चालक जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल चाफळकर आणि भु-या उर्फ कु-हे अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन अशोक जगताप (३५ रा.मंदार अपा.कलानगर जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. जगताप शुक्रवारी (दि.५) जेलरोड येथील चर्च भागात गेले होते. परिसरातील मेडिकल शेजारील फुटपाथवर त्यांनी आपली कार पार्क केली असता ही घटना घडली.
दोघा संशयितांनी घरासमोर कार का पार्क केली असा जाब विचारत त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी एकाने हातातील वजनी कडे जगताप यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.
महिलेच्या पर्स मधील दागिणे चोरट्यांनी केले लंपास
नाशिकरोड बसस्थानक परिसरात गर्दीची संधी साधत बसमध्ये चढणा-या महिलेच्या पर्स मधील दागिणे चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी दिप्ती प्रविण साळी (रा.अपोलो थेअटर जवळ,पुणे) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साळी शुक्रवारी (दि.५) रेल्वेने शहरात दाखल झाल्या होत्या. नाशिकरोड बसस्थानकातून त्या शहरात येण्यासाठी सिटी लिंकबसमध्ये चढत असतांना ही घटना घडली. बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून सुमारे ३२ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.