नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रोकडोबावाडी भागात लिफ्ट मागत एकाने दुचाकीस्वारावर चाकूने हल्ला केल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. याप्रकरणी विनोद विश्वनाथ अडांगळे (३५ रा.गवळीवाडा,आर्टिलरीरोड ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडांगळे गुरूवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास देवळाली गावातून रोकडोबावाडीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत होते. वालदेवी नदीवरील ब्रिज भागात त्यांना एका अनोळखी व्यक्तीने हात देवून थांबविले. यावेळी सदर व्यक्तीने दमदाटी करीत विहीतगाव येथे सोडण्यास सांगितले. मात्र अडांगळे यांनी आपण तिकडे जात नसल्याचे सांगितल्याने ही घटना घडली. संतप्त संशयिताने कमरेस लावलेला धारदार चाकू काढून अडांगळे यांच्यावर सपासप वार करून जखमी केले. संशयिताने पोबारा करताच जखमी अडांगळे यांनी कसेबसे घर गाठले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.