नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राणेनगर भागात शाळेच्या मैदानावर छेड काढत अल्पवयीन मुलीस धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या धमकीमुळे भेदरलेल्या विद्यार्थीनीने शाळेला दांडी मारत समाज मंदिराचा आश्रय घेतल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवा उर्फ शुभम ताकतोडे (रा.उपेंद्रनगर,सिडको) असे संशयिताचे नाव आहे. राणेनगर येथील शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी गुरूवारी (दि.१६) नेहमीप्रमाणे स्कुल व्हॅनने शाळेत गेली होती. व्हॅनमधून उतरून ती शाळेच्या मैदानातून वर्गात जात असतांना ही घटना घडली. संशयिताने तिला रस्त्यात गाठून चल आपण फिरायला जावू असे म्हणत छेडकाढली. यावेळी त्याने तू आली नाही तर बघतो अशी धमकी दिल्याने व त्याची मजल थेट वर्गापर्यंत जाण्याची असल्याने भेदरलेल्या मुलीने तेथून पळ काढला. शाळेस दांडी मारून वर्ग सुटे पर्यंत तिने जवळच्या समाज मंदिराचा सहारा घेतला. सायंकाळी घरी पोहचल्यानंतर तिने कुटूंबियाकडे आपबिती कथन करण्यापूर्वीच शालेय शिक्षीकेने तिच्या गैरहजरीबाबत पालकांना फोन केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. चौकशीत मुलीने संशयित पाठलाग करून नेहमी त्रास देत असल्याचे सांगितल्याने पालकांनी त्याचा मोबाईल नंबर मिळवित संपर्क साधला असता त्याने शिवीगाळ करीत धमकी दिली. त्यामुळे पालकांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत. दरम्यान या शाळा परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांकडून होत आहे.