नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तपोवनातील कपिलासंघम भागात पर्यटनासाठी आलेल्या महिलेच्या पर्स मधून एक लाख चोरट्यांनी लंपास केले. या चोरीची तक्रार प्रेमा गोपाल रेड्डी (४२ रा.देवगन्नापली जि.क्रिष्णागिरी तामिळनाडू) यांनी केली असून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेड्डी गुरूवारी (दि.१६) पर्यटनानिमित्त शहरात आल्या होत्या. शहर परिसरातील देवदर्शन आटोपून त्या सहका-यांसमवेत तपोवनात गेल्या असता ही घटना घडली. तपोवनातील मंदिरामध्ये देवदर्शन आटोपून त्या कपिला संघम येथे सोबत आलेल्या अन्य नागरीकांसमवेत फेरफटका मारीत असतांना अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत त्यांच्या पर्स मधील एक लाखाची रोकड हातोहात लांबविली. ही रक्कम सोबत असलेल्यांनी खर्चासाठी एकत्रीत जमा केलेली होती. अधिक तपास जमादार गायकवाड करीत आहेत.