नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोलपंपावरुन दीड लाखाची लुट करणा-या तीन जणांना पोलिसांनी अवघ्या चार तासात गजाआड केले आहे. या घटनेत पेट्रोलपंपाच्या कर्मचा-यांच्या मदतीने ही लुट करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ही लुट करणारे संशयित अभिजित गणपत ढिकले (२५ रा. सैय्यद पिंप्री, नाशिक), अनिकेत बाळासाहेब रसाळ (२० रा. साई स्फूर्ती सोसायटी. बोधले नगर नाशिक) यांना ठाणे जिह्यातील शहापूर येथून ताब्यात घेतले. तर पेट्रोल पंपावरील कर्मचारी सचिन शरद गोडसे (१९ रा. चारी न. ६, माडसांगवी) ओळागांव येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास ओढा येथील शिवसरस्वती पेट्रोल पंपावर ही घटना घडली होती. येथील रात्रपाळीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करीत तोंडाला रुमाल बांधून दोन अज्ञात चोरटयांनी ही लुट केली. बाटलीत पेट्रोल घेण्याच्या बहाण्याने हे चोर आले. त्यानंतर ते १ लाख ४२ हजार रुपये घेऊन फरार झाले होते. या लुटीनंतर आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केल्यानंतर या लुटीचा बनाव उघड झाला. पोलिसांनी संशयितांकडून १ लाख ४२ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ७५ हजार रुपयांची दुचाकी असा २ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या सर्व तपासाची माहिती उप आयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.