नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबादरोडवरील महापालिकेच्या जुन्या फायर ब्रिगेड कार्यालय परिसरात उघड्यावर जुगार खेळणा-या तिघांविरुध्द पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास दशरथ जाधव (रा.लक्ष्मणनगर, तेलंगवाडी फुलेनगर),सुनिल कोंडू गुंजाळ (रा.कोशिरे मळा, हनुमानवाडी) व मिथून मारीया जाधव (रा.तेलंगवस्ती, फुलेनगर) अशी संशयित जुगारीची नावे आहेत. मालेगाव स्टॅण्ड ते मखमलाबादरोडवरील मनपाच्या जुने फायरब्रीगेड ऑफिस समोर उघड्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.१६) पथकाने धाव घेत तिघांच्या मुसक्या आवळल्या. संशयित अंक आकड्यावर टाईम नावाचा मटका जुगार खेळत होते. संशयितांच्या ताब्यातून २१ हजार ६०० रूपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी शिपाई मुक्तार शेख यांनी फिर्यादी दिली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.