ओला गाऊन पेटत्या गॅसवर वाळवत असतांना महिला भाजली; उपचारा दरम्यान मृत्यू
नाशिक : सिडकोतील सावतानगर भागात अंगावरील ओला गाऊन पेटत्या गॅसवर वाळवत असतांना ८५ वर्षीय वृध्दा भाजल्याची घटना घडली. या घटनेत गंभीर भाजलेल्या मुक्ताबाई ओमकार वाघोदे (रा.साईबाबानगर,सावतानगर) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाघोदे या घरकाम करीत असतांना अंगाव पाणी पडल्याने त्यांचा गाऊन ओला झाला होता. त्यामुळे त्यांनी गॅस पेटवून गाऊन वाळविण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली. पेटत्या गॅसवर त्या गाऊन वाळवित असतांना अचानक अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. नातू विनायक वाघोदे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता रविवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
सेंट्रींग प्लेटा चोरट्यांनी चोरल्या
नाशिक : आडगाव शिवारातील लोकमान्य हॉस्पिटल भागात बांधकाम सुरू असलेल्या साईटवर ठेवलेल्या सेंट्रींग प्लेटा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण बाळासाहेब राऊत (रा.मेरी,दिंडोरीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राऊत यांचा सेंट्रींगचा व्यवसाय आहे. लोकमान्य हॉस्पिटल भागातील सनराईज टॉवर या नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवर त्यांचे काम सुरू होते. या ठिकाणी ठेवलेल्या सुमारे ३२ हजार २०० रूपये किमतीच्या सेंट्रींग प्लेटा चोरट्यांनी चोरून नेल्या. अधिक तपास पोलिस नाईक आहिरे करीत आहेत.