नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट जात प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणा-या महानगरपालिकेच्या वॉल्व्हमनविरुध्द गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महापालिका आणि शासनाची फसवणुक केली आहे. कागदपत्रांच्या पडताळणीत ही धक्कादायक माहिती समोर आल्याने संबधीत कर्मचा-याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशिकांत राहूल कोंदे (५० रा.कुंभारवाडा,जने नाशिक) असे संशयित कर्मचा-याचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक आयुक्त जवाहरलाल टिळे यांनी तक्रार दाखल केली आहे. कोंदे महापालिकेत वॉल्व्हमन पदावर कार्यरत असून, त्यांनी नोकरीस लागतांना जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. या कागदपत्राच्या पडताळणीत सदरचे प्रमाणपत्रावर संशोधन अधिकारी तथा सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांची बनावट साक्षरी असल्याचे समोर आले आहे. संशयित कोंदे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे महापालिकेत नोकरी मिळवून शासनाची व मनपाची फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.