नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाटावरील वर्दळीच्या गौरीपटांगणावर धारदारशस्त्राने गळा कापण्याची धमकी देत सराईत गुन्हेगाराने एकास लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी सत्यम नारायण तिवारी (१९ रा.बेलदारगल्ली,घारपुरे घाट) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळा कोयता असे संशयित सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तिवारी गुरूवारी (दि.१६) गोदाघाट भागात गेला होता. सायंकाळच्या सुमारास तो आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. गौरी पटांगणावरील सार्वजनिक शौचालया जवळून तो पायी जात असतांना पोलिस रेकॉर्डवरील काळा कोयत्या नामक सराईताने त्यास रोखले. यावेळी कमरेचा धारदार कोयता काढून संशयिताने तरूणाच्या गळयास लावला. कोयत्याने कापून टाकेन अशी धमकी देत त्याने तरूणाच्या शिखातील दोनशे रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला. या घटनेने भेदरलेल्या युवकाने कसेबसे पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.