नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉलेजरोड भागात शोरूममध्ये डेमोसाठी ठेवलेले महागडे अॅपल वॉच दोन तरूणांसह एका तरुणीने चोरुन नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हे घड्याळ काऊंटरवर डेमोसाठी ठेवलेले सुमारे ३३ हजार ९०० रूपये किमतीचे अॅपल कंपनीचे आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चोरट्या त्रिकुटाचा शोध घेत आहेत. मयुर अनिल खुर्दळ (रा.गोविंदनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खुर्दळ यांचे कॉलेजरोडवरील श्रध्दा मोबाईल भागात शॉप विनस डेटा प्रॉडक्ट प्रा.लि.नावाचे शोरूम आहे. या शोरूममध्ये गुरूवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास दोन मुले व एक युवती ग्राहक म्हणून आले होते. महागड्या घड्याळ खरेदीच्या बहाण्याने आलेल्या त्रिकुटाने अॅपलसह विविध कंपन्यांचे घड्याळ बघितले. यावेळी मालक व नोकरांचे लक्ष नसल्याची संधी साधत संशयितांनी काऊंटरवर डेमोसाठी ठेवलेले सुमारे ३३ हजार ९०० रूपये किमतीचे अॅपल कंपनीचे घड्याळ हातोहात लांबविले. ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाल्याने निदर्शनास आली असून पोलिस तिघांचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.