विदेशात नोकरी लावून देतो अशी बतावणी करुन बेरोजगारास साडे पाच लाखाचा गंडा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील एकाने विदेशात नोकरी लावून देतो अशी बतावणी करुन बेरोजगारास साडे पाच लाख रूपयांचा गंडा घातला आहे. वर्ष उलटूनही नोकरी व पैसे परत न मिळाल्याने तरूणाने तगादा लावला असता संशयिताने टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल पानपाटील (३४ सिडको) असे बेरोजगारास गंडा घालणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अंकित राजेंद्र गोसावी (२८ रा.गोसावीनगर,लोखंडे मळा,जेलरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. संशयिताने बेरोजगार युवकास २०२१ मध्ये विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार डिसेंबर महिण्यात ५ लाख ६० हजार रूपयांची रोकड धनादेशाच्या माध्यमातून स्विकारण्यात आली होती. मात्र वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही तसेच संशयिताने पैसेही परत केले नाही. त्यामुळे युवकाने पैश्यांसाठी तगादा लावला असता संशयिताने त्यास टाळाटाळ सुरू केल्याने युवकाने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक भोळे करीत आहेत.
शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूरगावात हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. सोमनाथ उर्फ सनी रघूनाथ झांजर (२२ रा.गोदावरीनगर,गंगापूरगाव) असे अटक करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी झांजर याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्यास एक वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच बुधवारी (दि.१५) रात्री तो गंगापूरगावातील डी.एन.पाटील विद्यालयाजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गंगापूर पोलिसांनी धाव घेत त्यास बेड्या ठोकल्या असून अंमलदार मच्छिंद्र वाघचौरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.