नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोरेवाडी भागात जुन्या वादाची कुरापत काढून तीन जणांच्या टोळक्याने तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. छकुल्या वाघमारे व त्याचे दोन साथीदार अशी तरूणास मारहाण करणा-या संशयित त्रिकुटाचे नाव आहे. याप्रकरणी याप्रकरणी निखील लवेश कदम (२० रा.शास्त्रीनगररोड गोरेवाडी) या युवकाने तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदम मंगळवारी (दि.१४) रात्री परिसरातील किशोर किराणा स्टोअर्स या दुकानावर गेला असता ही घटना घडली. निखील कदम दुकानावर उभा असतांना संशयित तेथे आले. यावेळी वाघमारे याने जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ केली असता तीघांनी त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी टोळक्याने तू जर पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने भेदरलेल्या तरूणाने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.