नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील अश्विन नगर भागात पितापुत्रास तब्बल ५४ लाख रुपयांना गंडा घालणा-या श्री गजानन एन्टरप्राईझेस कंपनीच्या सीईओ मिनल गोसावी या महिलेविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अठरा कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे सांगून प्रोसेसिंग फी तसेच अन्य बहाण्याने ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या फसवणूक प्रकरणी स्वप्नील सुभाषचंद्र हेगडे (४४ रा.अश्विन नगर) यानी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, १८ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे सांगून या महिलेने अगोदर एक टक्का प्रोसेसिंग फीचे १८ लाख रुपये घेतले. यावेळीच टर्म इन्शुरन्स काढून देण्याच्या बहाण्याने तीन लाख घेतले. त्यानंतर व्याजाने ३५ लाख व वडिलांकडून माझ्या नावाने १८ लाख रूपये असे एकुण ७४ लाख घेतले. त्यापैकी २० लाख परत केले. पण, उर्वरीत रक्कमेला गंडा घातला. आता या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.